जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटीव्ह
तब्येत उत्तम असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलाय. त्यांनी ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
अहवाल पॉझिटीव्ह असला तरी काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत असल्याचे पाटील म्हणाले. लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती त्यांनी केलीय. तसेच जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील रुग्णसंख्या वाढली
राज्यात रूग्णसंख्येत पुन्हा कमालीची वाढ व्हायला लागलीय. बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ८ टक्क्यांच्या पुढे गेलाय. जानेवारीत कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये कपात झाली होती. रेट 5 टक्क्यांवर आला होता. त्यामुळे राज्यात अनेक सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या.
मात्र आता पुन्हा रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रूग्णवाढीचा दर 5 टक्के होता. मात्र गेल्या आठवड्यात तो अचानक दुप्पट झालाय.
फेब्रुवारीच्या १५ आणि १६ तारखेला राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ९ टक्क्यांवर गेलाय. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णवाढीचा दर झपाट्याने वाढतोय.