मुंबई: कोरोना व्हायरसचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून जनतेला करण्यात आलेल्या आवाहनाला हरताळ फासण्यात येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. राज्यभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. परिस्थिती इतकी गंभीर असतानाही लोकांना त्याची जाणीव नाही. मी स्वत: फिरून हा अनुभव घेतला. लोक ऐकायला तयार नाहीत. यावर राज्यात संचारबंदी लागू करणे, हा एकमेव उपायच उरला आहे. अभी नही तो कभी नही, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच कोरोनाच्या काळात तुम्ही केलेल्या कामाची  अनेकजण  प्रशंसा करत असल्याचेही आव्हाडांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. मात्र, काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नाही. यासाठी आव्हाड यांनी ट्विटसोबत मुलुंड चेकनाक्यावर झालेल्या वाहनांच्या गर्दीचा फोटो जोडला आहे. या लोकांना कोरोनाचे संकट किती गंभीर आहे, याची कल्पनाही नाही. त्यामुळे केवळ लॉकडाऊनने भागेल, असे वाटत नाही. आता राज्यात संचारबंदीच लागू करायला पाहिजे, असे आव्हाड यांनी सांगितले.


 


तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून नागरिक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसल्याची खंत व्यक्त केली होती. कृपा करून स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा. दिलेल्या आदेशांचे पालन करा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.
सध्या राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यात आहे. हा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात गेल्यास राज्यासमोर गंभीर संकट उभे राहू शकते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील लोकलसेवा सामान्यांसाठी बंद केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. तर खासगी कंपन्यांनाही 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश देण्यात आले होते. मात्र, तरीही अनेक नागरिक रस्त्यांवर विनाकारण गर्दी करताना दिसत आहेत.