मुंबई : राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील उद्या म्हणजेच बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजपच्या पक्षकार्यालयात हा प्रवेश होणार आहे. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असले तरी त्यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील यांचा कोणताही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली मात्र त्यातही माढ्याच्या जागेबाबत काहीही निर्णय झालेला नाही. माढ्याची उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळे मोहिते पाटील नाराज आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपकडून माढ्यात उमेदवारी दिली जावू शकते. माढा येथे रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी विरोध केला आहे. राष्ट्रवादीने देखील या जागेबाबत कोणतीच भूमिका स्पष्ट केली नसल्याने रणजित सिंह मोहिते- पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशी चर्चा आहे. यामुळे काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीला देखील धक्का बसला आहे.


महाराष्ट्रामध्ये भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे पाटील यांच्यानंतर आता विखे पाटील हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची आता चर्चा आहे. यामुळे आघाडीला येणाऱ्या काळात आणखी झटका बसण्याची शक्यता आहे.