मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ही कारवाई केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर एका तरूणीने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीच्या डोक्यात टिकटिक वाढवणारी आणखी एक बातमी आली आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना सकाळी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, यानंतर समीर खानला अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी नवाब मलिक यांनी आरोप फेटाळत, या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील मुच्छड पानवाला याला अटक करण्यात आल्यानंतर समीर खान याला समन्स पाठवण्यात आलं होतं.


नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. समीर खान आणि करन संजानी यांच्यात 'गुगल पे'वर २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. हा व्यवहार संशयात्मक असल्याचं सांगण्यात येत होतं. ड्रग्ज पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाल्याचा संशय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आहे, त्यावरुन आज चौकशीनंतर समीर खान याला अटक करण्यात आली आहे.


खार परिसरातून मागील महिन्यात ब्रिटिश नागरीक राहिल फर्निचरवाला आणि करन संजानी यांना अटक करण्यात आली होती. ही घटना मागील आठवड्यातील आहे. राहिल आणि करन यांच्याकडून २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. 


समीर खान आणि राहिल फर्निचरवाला, करन संजानी यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, त्याची चौकशी आज एनसीबीकडून सुरु होती. यापूर्वीच मुच्छड पानवाला याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.