महाजनादेश आणि जनआशीर्वाद यात्रेला शिवस्वराज्य यात्रेतून राष्ट्रवादीचं उत्तर
राष्ट्रवादीचे स्टार चेहरे मैदानात....
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आणि आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. राष्ट्रवादीकडून या शिवस्वराज्य यात्रेचा चेहरा म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे या शिवस्वराज्य यात्रेची धुरा सोपवण्यात आली आहे. यावेळी उदयनराजे भोसले हे देखील या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत.
शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपतीं शिवरायांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून सुरू होईल. ही यात्रा रोज ३ विधानसभा मतदारसंघातून जाईल. शिवस्वराज्य यात्रा ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला टप्पा हा जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा येथे संपेल.
१६ ऑगस्ट रोजी या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा तुळजापूर येथून सुरू होईल. या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण यात्रेची मदार युवक राष्ट्रवादी काँग्रेसवर असणार आहे.