मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार आहे. तसंच राष्ट्रवादी सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. सरकार स्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल. भाजप-शिवसेनेला कौल मिळाला आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला मदत करणार का? असे प्रश्न निकाल लागल्यानंतर विचारण्यात येत होते, पण प्रफुल्ल पटेल यांनी हे सगळे दावे फेटाळून लावले आहेत.


काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काही वक्तव्य केली होती, त्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला होता. पण प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यामुळे हा संभ्रम दूर झाला आहे.


शिवसेनेने आमच्याशी अजून संपर्क साधला नाही, पण त्यांनी समर्थन मागितलं तर आम्ही पक्षश्रेष्ठींची बोलून निर्णय घेऊ, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रीपद हवं का उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेनेने ठरवावं, असं वक्तव्य केलं होतं.