Digital Drugs : तणाव वाढला की त्यावर मात करण्याचे उपाय  प्रत्येकजण आपापाल्या परीनं  शोधत असतो. एका संशोधनाच्या आधारे असं ही आढळून आलं आहे की अनेकदा तणावातून मुक्त होण्यासाठी ते एखाद्या नशेच्या आहारी जातात आणि त्याचवेळी त्यांना सूरांचा आधार ही घ्यावासा वाटतो. हळूहळू ती व्यक्ती त्याच्याही नकळत याच्या आहारी जाते. आणि ही एक जीवघेणी समस्या बनते. नशेसाठी घेतली जाणारी दारू असो वा  कोकेन भांग चरस गांजा, एसएसडी सारखे पदार्थ असोत, या नशेचं एक वेगळंच जग असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या पदार्थांचं सेवन न करताही नशा करता येण्याजोगा एक प्रकार आता तरूण पिढीला आपल्या विळख्यात घेत आहे. थेट सेवन न करताही या ड्रग्जची नशा तरूणांना भुरळ घालते आहे. आणि ती अधिक घातक आहे, कारण ही  नशा ऑनलाईन आहे. हे आहेत डिजिटल ड्रग्जस्. 


एका अभ्यासानुसार आता अनेकजण ताणापासून मुक्त होण्यासाठी डिजिटल ड्रग्सच्या आहारी जाऊ लागले आहेत. याचा ट्रेण्ड इतका वाढत चालला आहे की आता यावर संशोधन सुरू झालं आहे. या ड्रग्जचं नाव आहे बायनॉरल बीटस् (binaural beats). 


बायनॉरल बीटसं म्हणजे संगीताचाच एक प्रकार आहे जो ऐकता ऐकताच तुम्हाला त्याची नशा चढते. आणि ही नशा चढण्यासाठी लागतो तो फक्त एक मोबाईल, हेडफोन आणि इंटरनेट कनेक्शन..


बायनॉरल बीट म्हणजे असे ऑडीओ ट्रॅक की जे सातत्यानं ऐकलं की तुन्हाला त्यांची नशा चढते. 


बायनॉरलचा अर्थ आहे दोन कान आणि बीटस् म्हणजे ध्वनी. हा एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी आहे ज्यात तुमच्या दोन्ही कानात वेगवेगळ्या फ्रिक्वन्सीचे  आवाज येतात. या दोन वेगवेगळ्या फ्रिक्वन्सीच्या आवाजांमुळे तुमच्या मेंदूत गोंधळ निर्माण होऊन तुमचा मेंदू या दोन्ही ध्वनीलहरी एकत्र आणण्याचं काम करतो आणि ही कसरत करतानाच तुमच्या मेंदूत अजून एक वेगळाच ध्वनी तयार होतो जो तुम्हाला अधिक तीव्रतेने ऐकायला मिळतो. 


मात्र तुमचा मेंदू हे काम करत असताना तुम्ही एका वेगळ्याच स्थितीत जाता जी तुम्हाला शांत करते, एका वेगळ्या जगात नेते. तुमची तंद्री लागते आणि एका नशेत तुम्ही जगायला लागता. मेंदूच्या या स्थितीला ह्यॅल्युसिनेश म्हटलं जातं. आणि हळूहळू तुम्हाला ही  डिजिटल ड्रग्जची नशा आवडायला लागते.  


आपल्याकडे जरी या डिजिटल ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला नसला तरी अमेरिका, मेक्सिको. ब्राझील, रोमानिया, पोलंड आणि ब्रिटनमध्ये याचा ट्रेंड वाढत चालला आहे. एका सर्वेक्षणानुसार 34.7 टक्के व्यक्ती आपला मूड बदलावा म्हणून तर 11.7 टक्के व्यक्ती नशिल्या पदार्थाच्या सेवनाचा आनंद मिळावा यासाठी बायनॉरल बीटसं एकत आहेत. काहीजण डिजिटल ड्रग्जस् सप्लिमेंट म्हणून घेतात तर 12 टक्के व्यक्तींना दोन तासाहून अधिक काळ या डिजिटल ड्रग्जच्या तंद्रीत राहायला आवडतं. 


मानसोपचार तज्ज्ञांच्या मते केवळ इंटरनेटच्या आधारे केली जाणारी ही नशा अधिक घातक आहे. सातत्यानं हे बायनॉरल बीट्स ऐकल्याने तंद्री लागत असल्यानं ते वारंवार एकले जातात. या डिजिटल ड्रग्जचा   शारिरिक आणि मानसिक काय  परिणाम होत असतो यावर अजून संशोधन झालेलं नसलं तरी याला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे.. कारण कुठल्याही गोष्टींच व्यसन वाईटचं.