Maharashtra Politics : महाराष्ट्रात सरळ सरळ महाभारत घडले. एकाच घरातील लोक एकमेकांसमोर युद्धासाठी उभे आहेत हे खरे, पण येथे कोणी भीष्म, कृपाचार्य व द्रोणाचार्य दिसत नाहीत. हरुन-अल-रशीद यांचे पात्र महाभारतात नव्याने उदयास आले इतकंच, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतासमोरचे यक्षप्रश्न कोणते व ते कसे सोडवायचे? यावर कोणीच बोलत नाही. चर्चा होत आहे ती महाराष्ट्रातील अनैसर्गिक सत्तांतराची. अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपया '80' इतका खाली कोसळला. एक डॉलर विकत घेण्यासाठी आपल्याला 80 रुपये मोजावे लागत आहेत.  गॅसचे सिलिंडर 50 रुपयांनी महागले. त्यामुळे मध्यमवर्गीय समाज खचला आहे. स्विस बँकेत भारतीयांचे काळे धन 20,700 कोटी इतके होते. त्यात वाढ झाली असून ते आता 39,468 कोटी इतके झाल्याची अधिकृत माहिती समोर आली. 


त्यामुळे आता नागरिकांच्या खात्यात 15-15 लाख नाही, तर 40 ते 45 लाख रुपये मोदी सरकारकडून जमा होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.


एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. अमृता फडणवीस यांनीच घरातले गुपित फोडले.  देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत. काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


नागपूरचे आणि ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी. हरुन-अल-रशीद हा उत्तम खलिफा, पण बगदादला जसा चांगला राजा होता तसा चोर व लुटारूंचा सुळसुळाट होता. ‘थीफ ऑफ बगदाद’ किंवा ‘अलिबाबा चाळीस चोर’ या सर्व कथा आणि दंतकथा बगदादशी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरुन-अल-रशीद नक्की काय करणार? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.