मुंबई : कोरोनामुळे ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात काही प्रमाणात सूट देणार आहेत. शिक्षण विभागाने दिलासा देण्यासाठी अभ्यासक्रमातील २५ टक्के भाग वगळण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या अभ्यासक्रम कपातीविषयी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. प्रत्यक्षात अभ्यासक्रमातून कुठलाही धडा वगळलेला नाही. केवळ ऍक्टिव्हिट बेस संकल्पना आणि जादा प्रश्न कमी करण्यात आलेत. त्यामुळे शिक्षकही संपूर्ण पाठय़पुस्तक शिकविण्यावर भर देत आहेत. बोर्डानं लवकरात लवकर प्रश्नपत्रिकांचं स्वरूप जाहीर करून परीक्षांची काठीण्य पातळी यंदाच्या वर्षापुरती कमी करावी अशी मागणीही केली जात आहे. 


यंदा इयत्ता बारावीची परीक्षा ही १५ एप्रिलनंतर होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर दहावीची परीक्षा ही येत्या १ मेनंतर होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी फेब्रुवारीत होणाऱ्या १२ वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर विचार करत असल्याची माहिती दिली आहे.



कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. तर, मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या, तरी विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षा कधी होणार, याकडे लक्ष होते.