मुंबई : राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपद दिले जाणार या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचे वृत्त होते. मात्र, अजित पवारांच्या नाराजीचे वृत्त निराधार. कोणीही नाराज नाहीत. जे जिथं आहेत तिथेच राहणार आहेत. मंत्रिमंडळात बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसेंना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना आपले पद सोडून त्यांच्याकडे प्रदेशचे अध्यक्षपद देणार अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. कुणाचंही पद जाणार नाही आणि मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी खडसेंच्या प्रवेश कार्यक्रमाच्या भाषणात स्पष्ट केले. मात्र यामुळे आता एकनाथ खडसेंना नेमकं काय देणार याबाबत उत्सुकता लागली आहे. 


एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये जवळपास चाळीस वर्षं घालवलेले खडसे राष्ट्रवादीवासी झाले. खडसेंसह त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात खडसेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. 


आपण कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, कुठल्याही महिलेच्या आडून राजकारण केलं नाही. आता कुणीकुणी किती भूखंड घेतले, हे मीच दाखवेन, अशा इशाराही खडसेंनी राष्ट्रवादी पक्षप्रवेशावेळी दिला. ज्या निष्ठेनं भाजपमध्ये काम केलं, त्याच निष्ठेनं राष्ट्रवादीचं काम करू आणि दुप्पट वेगानं राष्ट्रवादी वाढवून दाखवेन, असा शब्द एकनाथ खडसेंनी शरद पवारांना दिलाय. तर खडसे दिलेला शब्द नेहमी पाळतातच, असं म्हणत शरद पवारांनी खडसे यांचे पक्षात स्वागत केले.