पुढील २४ तासात मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस कोकणात पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ४ आणि ५ ऑगस्ट दरम्यान मुंबई, ठाणे उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ही स्थिती ६ ऑगस्टपर्यंत कायम राहणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
याबाबतीत माहिती हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. शिवाय मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
जून आणि जुलै महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त ३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा जुलै २०१९ मध्ये ८५.६८ टक्के व जुलै २०१८ मध्ये ८३.३० टक्के होता.
मुंबईमध्ये ऑगस्ट महिना उजाडला तरी पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. कमी पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधला जलसाठाही कमी झाला आहे. याचकारणामुळे मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.