शेअर बाजारात पुन्हा मोठी उसळी; सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला
आज सकाळी व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली घौडदौड सुरु ठेवल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई: मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर भांडवली बाजारात सोमवारी पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली. आज भांडवली बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास १७०० आणि निफ्टीने ६०० अंकांची उसळी घेतली. यानंतरही सेन्सेक्स सातत्याने १००० अंकांनी वर आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन कंपनी करात कपात जाहीर केली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच शेअर बाजाराने प्रचंड मोठी उसळी घेतली होती. मात्र, सोमवारच्या सत्रात हे वातावरण कायम राहील, का याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर आज सकाळी व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली घौडदौड सुरु ठेवल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या घोषणेनंतर कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर २२ टक्के करण्यात आले आहेत. तर अधिभार आणि सेस मिळून एकूण २५.१७ टक्के कर द्यावा लागेल. या माध्यमातून उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' या घोषणेला बळ देण्यासाठी सरकारने प्राप्तिकर कायद्यात तरतूद केली आहे. चालू आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये १ ऑक्टोबरनंतर उत्पादन प्रक्रियेत गुंतवणूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांकडे १५ टक्के दरापासून प्राप्तिकर भरण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. म्हणजेच १ ऑक्टोबर २०१९ किंवा त्यानंतरच्या भारतीय कंपन्यांना १५ टक्के कर भरावा लागेल. ३१ मार्च २०२३पूर्वी उत्पादन घेण्यास सुरुवात केली तर १५ टक्के कर भरावा लागेल. सर्व प्रकारचे अधिभार आणि सेस मिळून एकूण १७.१० टक्के प्रभावी दर आकारला जाणार आहे.