पहिल्याच रात्री `नाईट लाईफ`चा उडाला फज्जा
अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले.
मुंबई: मुंबईत सुरू करण्यात आलेल्या नाईट लाईफचा पहिल्याच रात्रीत फज्जा उडाला आहे. नियोजनाअभावी घेतलेल्या निर्णयामुळे नाइट लाईफच्या निर्णयाची अंमलबाजवणी फसल्याचे पहिल्याच रात्रीत पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी मॉल्स, मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले होते. तर गिरगाव चौपाटीसह इतर सहा ते सात ठिकाणी फूड ट्रक्स आणि रात्रभर खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र, काल रात्री गिरगाव चौपाटी पूर्णत: शांतच होती. मरिन ड्राईव्हवर नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी होती. परंतु रात्री दीड-दोननंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे इथलीही गर्दी हटवली. त्यामुळे अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले.
पुण्यात पहिल्यांदा 'आफ्टरनून लाईफ' सुरु करुयात - आदित्य ठाकरे
काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाने 'नाईट लाईफ' योजनेला हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनिवासी भागातील मॉल्स, हॉटेल आणि दुकाने रात्रीच्यावेळी सुरु ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मुंबईत रात्रीच्यावेळी अनेक पर्यटक येतात. अशावेळी त्यांना खाण्यापासून अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच शहरात रात्रीच्यावेळी काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आवश्यक होता. यामुळे रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळेल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते.
मात्र, भाजपने सुरुवातीपासूनच नाईट लाईफला विरोध केला आहे. नाईट लाईफमुळे मुंबईत दारू पिण्याची संस्कृती फोफावेल. त्यामुळे निर्भया प्रकरणासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल. ही संस्कृती आपल्या देशासाठी योग्य आहे का, याचा विचार सरकारने करावा, असे भाजप नेते राज पुरोहित यांनी म्हटले होते.