मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळला- नीलम गोऱ्हे
मराठा समाजातील आंदोलकांची तीव्र भावना लक्षात घेता मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला.
मुंबई: मराठा समाजाकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला विठुरायाच्या महापुजेला न जाण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर आता निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राज्याचा प्रमुख म्हणून हा निर्णय घेऊन उलट आपल्या जबाबदारीचे पालनच केले, असे मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मांडले.
राज्याचा मुख्यमंत्री हा विठ्ठलाच्या महापुजेला राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून जात नाही. यावेळी मराठा समाजाच्या विरोधामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर विठुरायाचे दर्शन घ्यायचे की राजधर्म पाळायचा, असे दोन पर्याय होते. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन राजधर्माचे पालन करायचे ठरवले. परंतु आजपर्यंतच्या वारकरी परंपरेनुसार सर्व जाती-धर्माचे लोक विठुरायाच्या दर्शनाला येतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अशाप्रकारे विरोध करणे, या संस्कृतीत बसत नाही. मात्र, मराठा समाजातील आंदोलकांची तीव्र भावना लक्षात घेता मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला. असे भाव तिथे देव, अशी म्हण आपल्याकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मनातील विठुरायाविषयीची श्रद्धा कमी होत नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.