आरेप्रमाणे नाणार आंदोलनातील गुन्हेही मागे घ्या- नितेश राणे
शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात जुंपण्याची चिन्हे आहेत.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात पर्यावरणप्रेमींवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे. सरकारने आरेप्रमाणेच नाणार आंदोलनातील गुन्हेही मागे घ्यावेत, असे आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले आहे.
'केंद्र सरकारने आकसाने वागू नये, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत द्यावी'
त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात जुंपण्याची चिन्हे आहेत. नितेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आरे आंदोलनातील केसेस मागे घेतल्या. आता नाणार आंदोलनातील गुन्हेही मागे घ्यावेत. ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कांसाठीच लढत होते, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आरेमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी फेटाळून लावल्या होत्या. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करत ४ ऑक्टोबरला रात्रीपासून झाडे तोडायला सुरुवात झाली होती. हे वृत्त समजल्यानंतर अनेक आंदोलक आरेमध्ये येऊन धडकले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. यापैकी २९ आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.