मुंबई: विनायक मेटे हे चायनीज मराठा असल्याची खोचक टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्यावर सडकून टीका केली. विनायक मेटे यांनी आरक्षणावर बोलूच नये. ते स्वत: मराठा आहेत का, याविषयी आम्हाला शंका वाटते. मला तर वाटतं ते चायनीज मॉडेलचे मराठा आहेत. त्यांचा डीएनए चेक करण्याची गरज आहे. आम्ही मुळचे ९६ कुळी मराठा आहोत, असे नितेश राणे यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या अधिवेशनात चांगलाच गाजत आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल विधानसभेत मांडावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र, त्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने अजूनही हा अहवाल सभागृहात मांडलेला नाही. 


राज्य शासनाने गुरुवारी संध्याकाळी मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याची अधिसूचना काढली. मात्र, आता अधिवेशनाचा केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ही समिती तज्ज्ञांना आमंत्रित कधी करणार आणि पुढील निर्णय कधी घेणार, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता.


दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेचा कायदेशीर पेच कसा सोडवायचा, हा प्रश्न राज्य सरकारपुढे आहे. त्यासाठी सरकार सध्या कायदेतज्ज्ञांशी चर्चाही करत आहे. मात्र, ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत राहून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे झाल्यास ओबीसी समाजाच्या आरक्षणात तडजोड करावी लागेल. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याचे ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात येईल, असे विधानसभेत स्पष्ट केले होते.