मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या नावे बँकेत ५८ हजार कोटींच्या ठेवी असूनही मुंबई बुडतेच कशी, असा सवाल केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. बोरिवली येथील कांदळवन उद्यान भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी शिवसेनेला चिमटे काढले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्या माहितीप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या बँकेत जवळपास ५८ हजार कोटींच्या ठेवी आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात आम्ही मुंबई पाण्यात बुडाल्याचे ऐकतो, असे सांगत गडकरी यांनी पालिकेला टोला लगावला. पालिकेने बँकेतील पैशांचा उपयोग करून समुद्रात जाणाऱ्या घाण पाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरात आणले पाहिजे, असा पर्यायही यावेळी गडकरींनी सुचवला.


तसेच मुंबईचा समुद्र मॉरिशस सारखा स्वच्छ व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. याशिवाय, मुंबईत इटलीतील व्हेनिस शहराप्रमाणे वॉटर टॅक्सी सुरु करण्याचा प्रकल्प मी तयार करून ठेवला आहे. यासाठी आपण लवकरच निविदा मागवल्या जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात वसई, विरार, कल्याण भागातील लोक हे मोटर किंवा टॅक्सीने नव्हे तर वॉटर टॅक्सीने प्रवास करतील, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. 


या कार्यक्रमाला भाजपाचे मंत्री, खासदार आणि आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचा एकही नेता या कार्यक्रमात नव्हता.