मुंबईत डीजे-डॉल्बी नाही, ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक
डीजे आणि डॉल्बीवर बंदी घातल्यामुळे पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढणार
मुंबई : शहरातील मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेत साधेपणाने गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयानं डीजे आणि डॉल्बीवर बंदी घातल्यामुळे पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढणार असल्याचा निर्णय या मंडळांनी घेतलाय. मुंबई अनंत चतुर्दशीला 4500 पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विविध चौपाट्यांवर विसर्जन होते. तर 30 हजारपेक्षा जास्त घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन होत.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि लवकर गणपती विसर्जन विना अडथळा व्हावे यासाठी मुंबई पोलीस सज्ज असून कडेकोड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तसेच वाहतुकीच्या मार्गात बदलही करण्यात आले आहेत. गणेशभक्तांनी शांतते आणि संपूर्ण सहकार्य करुन गणेश विसर्जन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विसर्जन न करण्याचा निर्णय
विसर्जन मिरवणुकीतील डीजे-डॉल्बीवरील बंदी सरकारनं तात्काळ हटवावी, अन्यथा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय पुण्यातील काही गणेश मंडळांनी घेतलाय. सरकारनं घेतलेली भूमिका तसेच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत दाखवलेली दिरंगाई, अन्यायकारक असल्याचं या गणेश मंडळांचं म्हणणं आहे.
डॉल्बी व्यावसायीकांचा तर या निर्णयाला विरोध आहेच. आता गणेश मंडळांनी देखील प्रखर विरोधांचं हत्यार उगारलय. पुण्यातील १०० ते १५० मंडळांनी एकत्र येत हा निर्णय घेतलाय. डॉल्बीवरील बंदी हटविण्यासाठी सरकारला आज सायंकाळपर्यंतची वेळ देण्यात आलीय.