Kolkata Doctor Rape Case नंतर मुंबईतील रुग्णालय अलर्ट; BMCने घेतला मोठा निर्णय
Kolkata Doctor Rape Case: कोलकाता महिला प्रशिक्षक डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर देशात संतापाचे वातावरण आहे.
Kolkata Doctor Rape Case: कोलकत्ता ट्रेनी डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. महिला डॉक्टरवर रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्येच बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर आता मुंबईतील रुग्णालयेही अलर्ट झाली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने रुग्णालयात कार्यरत सुरक्षा विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी रुग्णालयांत आणि हॉस्टेलमध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींना किंवा फूड डिलिव्हरी बॉयला एण्ट्री देऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे.
डॉक्टरांसह कोणीही हॉस्पिटल आणि कॉलेजच्या आवाराबाहेरुन खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यास ते आता मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन घ्यावे लागणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठक पार पडली. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले आहेत. रुग्णालयातील असुरक्षित जागा शोधून काढणे, संभाव्य ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज निश्चित करणे अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
अनेकदा डिलिव्हरी बॉय रुग्णालयात शिरतात तर कधी थेट ऑपरेशन थिएटरपर्यंत जातात. वसतिगृहात किंवा डॉक्टर ज्या वॉर्ड किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत त्या ठिकाणी जाऊन जेवणाची ऑर्डर देतात. हा प्रकार सुरक्षेच्या कारणास्तव अत्यंत धोक्याचे आहे. त्यामुळं फूड डिलिव्हरी बॉयला तात्काळ बंदी घालण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत.
दरम्यान, कोलकत्ता डॉक्टर मर्डर रेप केसमध्ये आरजीकर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.संदीप घोष यांची सलग तिसऱ्या दिवशीही सीबीआय चौकशी करणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची 10-10 तास चौकशी सुरू आहे. सीबीआयने डॉ. संदीप घोष यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. इतकंच नव्हे तर, सीबीआयने महिला डॉक्टरचे मित्र, विद्यार्थी आणि ज्युनिअर डॉक्टर यांच्याकडेही चौकशी केली आहे. या प्रकरणातील आरोपी संजय रॉय सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, ज्या प्रकारे पिडीतेची हत्या करण्यात आली ते कोणा एकाचे काम नसून या प्रकरणात तीन ते चार जणांचा सहभाग असू शकतो. पिडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.