मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांच्यासारखे वागू लागल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते मंगळवारी मुंबईतील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी अर्थव्यस्थेतील मंदीवरून भाजप सरकारला लक्ष्य केले. अर्थव्यवस्थेतील मंदी घालवायची असेल तर भाजपला सत्तेत येऊन देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सध्याची परिस्थिती पाहता देशाला दोन पंतप्रधानांची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मोदी हे सध्या आंतरराष्ट्रीय पंतप्रधान आहेत. त्यामुळे देशाचा गाडा हाकण्यासाठी आणखी एक पंतप्रधान हवा असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच राहुल गांधी यांच्याकडे मनमोहन सिंग यांच्यासारखा हुकमाचा एक्का असताना दुर्री-तिर्रीने का खेळत आहेत? ज्यादिवशी डॉ. मनमोहन सिंग राफेलवर बोलतील तेव्हा मोदी स्वत:चे कपडे फाडतील, अशी टीका आंबेडकर यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 याशिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा विजय झाल्यास आगरी, कोळी आणि भंडारी या मूळ मुंबईकरांच्या जमिनी त्यांच्या नावावर करू, असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीवरही टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, सध्याचे भाजप सरकार आणि त्यापूर्वीच्या आघाडी सरकारने पाट्या टाकल्या आहेत. या पक्षांनी वंचितच्या जाहीरनाम्यातील अनेक गोष्टी कॉपी-पेस्ट केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप सरकारने दुष्काळी भागात पाणी का फिरवले नाही? वंचितने हा अजेंडा घेतल्यानंतर भाजपला जाग आली. तर केजी टू पीजी हा मुद्दाही वंचितच्या अजेंड्याचा भाग आहे. परंतु, राष्ट्रवादीने हाच मुद्दा आता उचलून धरल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 


शेंबडा पोरगाही सांगेल, राज्यात महायुतीची सत्ता येईल- फडणवीस


प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या नाकर्तेपणावरही ताशेरे ओढले. राज्य सरकारने ज्या कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत, त्यापैकी एकही कंपनी सुरु झाली नाही. हे सरकार जनतेची फसवणूक करत आहे. आम्ही एक कोटी रोजगार निर्माण करू, असे आश्वासन सरकार देते. मात्र, राज्यात २०१४ नंतर दोन लाख लहानमोठ्या कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे तब्बल आठ लाख लोक बेरोजगार झाले आहेत. हे सर्व अंबानी उद्योग समूहाच्या फायद्यासाठी सुरु आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे नसून उद्योगपतींचे असल्याची टीका यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली. 


भाजपाचं संकल्पपत्र प्रसिद्ध, दलित-ओबीसी नेत्यांचा पाठिंबा