मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मातृभाषेतून शिक्षण घेत मोठं यश मिळवण्याची अनेक उदाहरणे असतानाही मराठी शाळांमधील (Marathi School) विद्यार्थी संख्या कमी होण्याचे सत्र सुरुच आहे. शाळांचा दर्जा घसरत असल्याचे म्हणत पालक मुलांना मराठी शाळेत घालण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे. अशातच गेल्या 10 वर्षात विद्यार्थी संख्येत तब्बल 51 टक्के घट झालीय. म्हणजेच पालकांनी मराठी शाळांकडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. प्रजा फाउंडेशनने (praja foundation) मुंबई महापालिकांच्या शाळांच्या (BMC School) स्थिती संदर्भातला अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार मराठी माध्यमात गेल्या 10 वर्षात विद्यार्थी संख्येत 51 टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. मात्र कोविड काळानंतर मराठी माध्यमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्येत 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


तर दुसरीकडे कोविडनंतर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी संख्या 27 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 10 वर्षात इंग्रजी माध्यमात विद्यार्थी संख्या 40 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे.


गेल्या 10 वर्षात मराठी शाळेच्या तुलनेत इंग्रजी माध्यमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तर कोविडनंतर मराठी माध्यमात 2 टक्क्यांनी विद्यार्थी संख्या वाढली आहे. दुसरीकडे गेल्या 10 वर्षात इंग्रजीत माध्यमात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे, अशी माहिती प्रजा फाऊंडेशने संवाद प्रमुख योगेश मिश्रा यांनी दिलीय.


दरम्यान, मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सातत्याने प्रगती होत असल्याचेही फाउंडेशने म्हटलंय.  या शाळेतील विद्यार्थी संख्येत 92 टक्क्यांची वाढ झाली आहे. प्राथमिक शिक्षणानंतर 40 टक्के विद्यार्थी हे मुंबई महापालिकेच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करत आहेत.