मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण रेल्वेकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत सरसकट लोकल प्रवासाला परवानगी देण्याच्या राज्याच्या प्रस्तावावर आता रेल्वेने आकडेवारीचे अडथळे उभे केलेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून रेल्वे सध्या केवळ २५ टक्के वाहतूक करू शकेल असे रेल्वेने पत्रकाद्वारे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य आणि पश्चिम रेल्वेने सरकारच्या ‘पंचसूत्री’लाच आक्षेप घेतला आहे. गर्दीची विभागणी वेगवेगळय़ा वेळांमध्ये करावी, असे सरकारचे म्हणणे असले तरी ‘पिकअवर’ला हा उपाय कामी येणार नाही. वेळेनुसार गर्दी विभागायची असेल तर कोलकात्याप्रमाणे खास मोबाईल अॅप आणावे लागेल, असे पत्रच रेल्वेने राज्य सरकारला पाठवले आहे.


रेल्वेच्या नव्या धोरणामुळे लोकलबाबत निर्णय होत नाही. त्यामुळे लोकल प्रवासाची सर्वसामान्यांची आशा सध्या तरी लांबणीवर गेली आहे. दर तासाला महिला स्पेशल चालविण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याचे म्हटले आहे. विरोधकांकडून सातत्याने रेल्वे सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, रेल्वे कारणे देत अडथळा आणत असल्याचे दिसून येत आहे.


 सरसकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने पश्चिम रेल्वे,मध्य रेल्वेला पत्र पाठविले होते. या पत्राला रेल्वेकडून उत्तर आले आहे. २२ आणि २७ ऑक्टोंबरला राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीचा संदर्भ देऊन, रेल्वेने कार्यालयीन वेळा बदलण्या संदर्भात या पत्रात उल्लेख केला आहे.ज्यामुळे गर्दीच्या वेळी अडचण होणार नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. लोकल सुरू झाल्यावर गर्दीचे नियोजन कसे करणार ?  अशी विचारणा या पत्राद्वारे रेल्वेने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या पत्रात प्रत्येक तासाला महिला स्पेशल गाडी चालवावी असे म्हटले आहे. पण ते तूर्तास शक्य नाही असे रेल्वेने आपल्या पत्रात म्हटले आहे.


कोरोना व्हायरच्या पार्वभूमीवर जवळपास सात महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणाऱी लोकल सेवा अत्य़ावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र अद्यापही ही रेल्वे सेवा सुरु करण्यास विलंब होत आहे.