मुंबई : मौजे गोंदेदुमाला, वाडिवरे इथल्या MIDC जमीन प्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलीय. बक्षी हे राज्याचे माजी अपर मुख्य सचिव आहेत. ही एक सदस्यीय समिती गेल्या १५ वर्षातले निर्णय तपासणार आहे. या समितीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.


या जमीन प्रकरणावरुन विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या मागणीनंतर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्दही केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा फेटाळला.


या प्रकरणी चौकशी करुन निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. चौकशीअंती जो काही निष्कर्ष असेल तो मान्य असेल असं सुभाष देसाई यांनीही म्हटलं होतं.


सुभाष देसाई यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केलीय. एक सदस्यीय चौकशी समिती म्हणजे मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्नच आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.