नवी मुंबई : अश्विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणाचा माग काढण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अभय कुरुंदकर याचा खासगी ड्रायव्हर कुंदन भंडारी याला नवी मुंबई पोलिसांच्या पथकानं उत्तर मुंबईतल्या कांदिवलीमधल्या त्याच्या राहत्या घरातून अटक केली. अश्विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणात कुंदन भंडारी याचाही सहभाग असल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अगोदर डिसेंबर महिन्यात ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांना अटक करण्यात आली होती. 


काय आहे प्रकरण 


कोल्हापूर जिल्ह्यातील आळते येथील अश्विनी जयकुमार बिंद्रे यांचा विवाह २००५ साली हातकणंगलेतील सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर एक वर्षानंतर अश्विनी पोलीस उपनिरीक्षक झाल्या. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. 


याच दरम्यान त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. काही कालावधीनंतर कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. या काळातच २०१५ साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. त्या हजर झाल्या नाहीत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप त्यांच्या पती आणि भावानं केल्यानंतर कुरुंदकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.