कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : रेल्वे स्टेशनपाठोपाठ आता मुंबई मेट्रोच्या स्टेशनवरही एक रूपयांत आरोग्य सुविधा मिळणार आहे. 'वन रूपी क्लिनिक' ही सेवा १५ ऑगस्टपासून घाटकोपर - वर्सोवा या मेट्रो मार्गावरील पाच स्टेशनवर सुरू केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पावधीत मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेली 'वन रूपी क्लिनिक' मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या पाच स्थानकांवर उपलब्ध आहे. एक रूपयांत आरोग्य सुविधा तर मिळतेच शिवाय अत्यंत कमी किंमतीत रक्त चाचणी, एमआरआय, स्कँन, एक्सरे अशा विविध चाचण्याही इथं केल्या जातात. 


रेल्वेच्या सहकार्याने वन रूपी क्लिनिक दीड महिन्यांपूर्वी सुरू झाली असून मध्य रेल्वेवर दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलूंड आणि हार्बर रेल्वे मार्गावर वडाळा इथं ही क्लिनिक आहेत. काही दिवसांतच ठाणे आणि मानखूर्द रेल्वे स्टेशनवरही ही सेवा सुरु होणार आहे. या दीड महिन्यांत साडे बारा हजार रुग्णांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. 


तसंच आता मेट्रो वन मार्गावरील अंधेरी, घाटकोपर, डीएन नगर,साकीनाका आणि मरोळ नाका या मेट्रो स्टेशनवरही १५ ऑगस्टपासून वन रुपी क्लिनिक सुरु केलं जाणार आहे.


रेल्वे प्रवाशांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने ही आरोग्य सुविधा मुंबईत सुरु केली आहे. रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशावर तात्काळ प्राथमिक उपचार होण्याच्या दृष्टीने ही आरोग्य सुविधा सध्या अधिक उपयोगी पडत आहे.