मुंबई : शहरात लोकलने फुकटात प्रवास करणाऱ्या आणि विनातिकिट धारकांना चाप लावण्यासाठी रेल्वेने दंडाच्या रक्कमेत चौपट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता २५० रुपयां ऐवजी १००० रुपये दंड आकण्यात येणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेतून विनातिकिट प्रवास केल्याने रेल्वेचा मोठा महसूल बुडतो. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना चाप लावण्यासाठी जास्तीत जास्त दंड आकारण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केलाय. यासंदर्भात नुकतेच मुंबई दौऱ्यावर आलेल्या रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहानी यांच्याशीही मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने चर्चा केली. त्यानंतर सविस्तर माहिती वजा अहवाल पाठविण्याची सूचनाही लोहानी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.


विनातिकिट प्रवास केल्यानंतर दंड आकारूनही प्रवाशांची संख्या काही केल्या कमी होत नाही. सध्या २५० रुपये दंड विनातिकीट प्रवाशांना आकारला जातो. पण त्याआधी अनेक वर्षे ५० रुपये दंड आकारला जात होता. त्यानंतर २००२ पासून २५० रुपये दंड आकारला जात आहे. हा दंड कमी असल्याने प्रवाशांना धाक नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दंडाच्या रक्कमेत वाढ करून थेट १,००० रुपये दंड आकारण्यात यावा, असा प्रस्ताव तयार करण्यात आलाय.