मुंबई : बॉलिवूड शहंशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचा जुहूतील प्रतिक्षा बंगला महापालिकेच्या रस्तारूंदीकरणाच्या मोहिमेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्यासमोरील मोकळी जागा रस्तारूंदीकरणासाठी जाणार आहे. बिग बींच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने रस्त्यासाठी अशी जागा जागू नये यासाठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे या दोघांकडील जागा घेऊन रस्त्याचं अडलेलं काम मुंबई महानगरपालिका पूर्ण करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. या रूंदीकरणात प्रतिक्षा बंगल्याबाहरेची ८ ते १० फूट जागा अधिग्रहीत केली जाणार आहे. तरीही अमिताभ बच्चन आणि त्यांचे शेजारी के. व्ही. सत्यमूर्ती यांनी या रूंदीकरणाला विरोध केला होता. या संदर्भात कोर्टात दाखल केलेले दावे फेटाळण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी अमिताभ बच्चन यांनी केल्याचं समजतं आहे. यासाठी अमिताभ आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी कंबर कसली आहे. 


जुहूतील सिग्नलवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रतिक्षा बंगल्याबाहेरची जागा अधिग्रहीत करण्यावर पालिका ठाम आहे. पालिका आणि अमिताभ बच्चन यांच्यातील हा संघर्ष येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता त्यामुळे वर्तवण्यात येत आहे. कोर्टाने सत्यमूर्ती यांचा दावा फेटाळल्यामुळे आता बिग बींना आपल्या बंगल्याच्या बाहेरची जागा रस्त्यासाठी सोडावी लागणार आहे.