Operation Farzi Bull Run : तुम्हाला कुणी सांगितलं की एखाद्या कंपनीला गेल्यावर्षात कवडीचाही नफा झालेला नाही. तरी सुद्धा कंपनीचा शेअर (Sahres) मात्र गेल्या तीन महिन्यांत 100 ते 150 टक्के वधारलाय. तर तुमचा कदाचित त्यावर विश्वास बसेल. कारण जर असं घडत असेल तर या शेकडो टक्क्यांच्या तेजीमागे नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. याच फर्जी बुल रनचा (Farzi Bull Run) झी मीडियाच्या इन्व्हेटिगेशनमध्ये पर्दाफाश झालाय. शून्य नफ्याच्या जोरावर भावाचे रोज नवे उच्चांक नोंदवणाऱ्या या कंपन्या खासगी नसून सरकारी आहेत. हे धक्कादायक असलं तरी हे खरंय. गेल्या तीन महिन्यात तोट्यातल्या सरकारी कंपन्यांचे शेअर्स तीन पटीनं वधारले आहेत. त्यामुळे छोट्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठं गौडबंगाल सुरु असल्याचं दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तोट्यातल्या कंपन्यांमध्ये तेजी का?
ज्या सरकारी कंपन्यांमध्ये हे गौडबंगाल सुरु आहे त्या कंपन्यांचे 90 टक्के शेअर सरकारच्या मालकीचे आहेत. उरलेले 1 टक्के ते 10 टक्के शेअर्स बाजारात खेळते आहेत. त्यामुळे केवळ 10 टक्के शेअर्सचंच ट्रेडिंग होतंय. या शेअर्सची किंमत कमी असल्यामुळे एखादा बडा गुंतवणूकदार (Investors) यातले बहुतांश शेअर्स खरेदी करू शकतो. त्यामुळे या शेअर्सची किंमत ठरवण्याची ताकद या गुंतवणूकदाराकडे येते. हा गुंतवणूकदार सोयीने छोट्या गुंतवणूकदारांना चढ्या दराचं आमिष दाखवून आकर्षित करतो. याच सापळ्यात सामान्य गुंतवणूकदार अडकतो. आणि या घोटाळेबाज बड्या गुंतवणूकदाराचं उखळ पांढरं होतं. 



अशी मोडस ऑपरेंडी गेल्या काही दिवसात तोट्यातल्या सरकारी शेअर्सच्या बाबतीत सुरू असल्याचं झी मीडियाच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झालंय. शेअर बाजारात गुंतवणूक करताना छोटे गुंतवणूकदार अगदी सहज अशाप्रकारच्या सापळ्यात अडकू शकतात. हा सापळा कोण लावतंय याचा शोध सेबीनं घेणं गरजेचं आहे. झी मीडियाच्या या इनव्हेस्टिगेटशननंतर तरी सेबी आणि संबंधित यंत्रणा जाग्या होतील आणि गुंवणूकदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य पावलं उचलतील अशी अपेक्षा आहे.