गोविंद तुपे / सुशांत पाटील, मुंबई : MHADA Scam : आता बातमी म्हाडातल्या घरांच्या घोटाळ्याची. (MHADA housing scam) म्हाडाचे अधिकारी आणि दलालांच्या अभद्र युतीतून मेलेल्यांच्या नावावर घरं लाटल्याचा 'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशनमधून आम्ही पर्दाफाश केला आहे. आता आम्ही तुम्हाला बाबू आणि दलालांच्या मदतीने गरिबांच्या तीन तीन घरांवर डल्ला मारणाऱ्या एका महिलेचा कारनामा. ऑपरेशन म्हाडा माफियाचा भाग- 2. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरसी नाथा स्ट्रीट. या घोटाळ्याचं उगमस्थान असलेलं मुंबईच्या मध्यवर्ती भागातलं मोक्याचं ठिकाण. इथंच आहे ही 192 ते 194 क्रमांकाची इमारत. सध्या ही इमारत ग्राऊंड प्लस वन दिसत असली तरी पूर्वी यावर चार मजले होते. या इमारतीत 28 खोल्या होत्या. मात्र फेरफार करून या खोल्यांचा आकडा 31वर नेण्यात आला. त्यामुळे ही इमाहत म्हाडाच्या मास्टर लिस्टवर घरं लाटण्याचा अड्डाच बनली आहे. 


आणि याच अड्ड्यातली बोगस लाभार्थी म्हणजे आयशा अन्वर शेख. (बोगसचा स्टॅम्प) मुळात भाडेकरूंच्या सुरूवातीच्या यादीत या बाईंचं नावच नाही. पण दुसऱ्या लिस्टमध्ये त्यांचं नाव शेवटच्या नंबरवर अचानक अवतरल्याचं दिसतं...त्यामुळे या आयशा शेख नक्की आहेत तरी कोण? त्या राहतात कुठे? त्यांना घर मिळालं कसं? या सगळ्याचे 'झी 24 तास'ने जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केले. तेव्हा तुम्हालाही धक्का बसेल, अशी माहिती समोर आली. घर घेण्यासाठी आयशा शेख यांनी वरळी कोळीवाड्यातल्या पत्त्याचा आधार घेतलाय. पण आम्ही जेव्हा वरळी कोळीवाड्यात पोहोचलो तेव्हा हा पत्ताच अस्तित्वात नसल्याचं उघड झाले. मूळ पत्त्यावरच आयशा शेख यांचा ठावठिकाणा नसल्यानं आम्ही मोर्चा वळवला तो म्हाडाने त्यांना दिलेल्या फ्लॅटवर. 


म्हाडाच्या कृपेने आयशाची ऐश 


फ्लॅट नंबर - 1. आयशा यांना म्हाडाने करीरोड इथल्या सुखकर्ता सोसायटीत मार्च 2021मध्ये 13 व्या मजल्यावर 1307 क्रमांकाचा फ्लॅट दिला आहे. पण मंडळी इथं, तर कुलूप दिसत आहे. मग या मोहतरमा गेल्या तरी कुठे? मग आम्ही याचा आणखी खोलात जाऊन तपास केला. तर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी अजब कारनामा करून ठेवल्याचे समोर आलं. या बाईने सुखकर्तामधल्या रूमच्या बदल्यात दुसरीकडे फ्लॅट मिळावा. यासाठी म्हाडाकडे अर्ज केला. इतरांना हक्काच्या घरासाठी जोडे झिजवायला लावणाऱ्या सरकारी बाबूंनी मात्र तातडीने आयशाबाईंची मागणी मान्य केली आणि पहिल्या फ्लॅटवरचा हक्क सोडण्यापूर्वी दुसऱ्या फ्लॅटची खिरापत दिली. 



या आंदण दिलेल्या प्रभादेवीतल्या फ्लॅटवर आम्ही पोहचलो....तर या बाई फारच पोहोचलेल्या निघाल्याचं दिसले.  म्हाडाच्या कृपेनं आयशाची ऐश दिसून आली. फ्लॅट नंबर - 2. या बाईंनी केवळ लक्ष्मी नारायण इमारतीतीतला 409 क्रमांकाचा फ्लॅटच पदरात पाडलेला नाही तर सोसायटीकडे शेअर सर्टिफिकेटसाठी अर्जही केला आहे. 


या गौडबंगालाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांना गाठलं खरं पण एकाचंही तोंड उघडेना. एक महिला केवळ दलालांना हाताशी धरून एवढी घरं लाटू शकत नाही. एकाच नावाने एकाच प्रकरणात वेगवेगळी माहिती साद केलेली असतानाही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालं की तेच या अभद्र युतीत सहभागी झाले आहेत, असा प्रश्न निर्माण होतो.


आता तुम्हाला वाटेल आयशा बाईंच्या फ्लॅटची लिस्ट इथंच संपली असेल. पण मस्जिद बंदरच्या नरसी नाथा स्ट्रीटवरून निघालेल्या आयशा बाई वरळी कोळीवाडा, करीरोड आणि प्रभादेवीमार्गे थेट कुर्ल्यात जाऊन पोहोचल्या.  म्हाडाच्या कृपेनं आयशाची ऐश. फ्लॅट नंबर - 3. कारण कुर्ल्याच्या स्वान मिल संक्रमण शिबिरात आयशा बाईंनी तीन वर्षांपूर्वीच आणखी एका फ्लॅटवर डल्ला मारल्याचे म्हाडाच्याच कागदपत्रातून उघड झाले आहे.


'बात निकलेगी तो दूर तलक जायेगी', अशी प्रसिद्ध शायरी आहे. एका आयशाने म्हाडाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून आणखी किती घरांचा बाजार मांडलाय आणि अशा अजून किती आयेशा गरिबांच्या घरांवर डल्ला मारत आहेत, हे सांगता येणे कठीण आहे. मात्र 'झी 24 तास' घोटाळेबाजांचे इन्व्हेस्टीगेशन करून याचा वेळोवेळी पर्दाफाश करत राहणार.