सकाळी नऊच्या शाळेला विरोध! `सक्ती केल्यास...` स्कूल बस मालकांचा राज्य सरकारला इशारा
Maharashtra School Timing : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण निर्णयाला आता स्कूल बस मालकांनी विरोध केला आहे.
Maharashtra School Timing : राज्यातल्या चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजता भरणार आहेत (Pre Primary School Timing). सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक (GR) राज्य सरकारने काढलं आहे. आता पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा सकाळी नऊच्या नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांनी (School Bus Owner) विरोध केला आहे. शिक्षण विभागाने चर्चा न करता मार्ग काढल्याने निर्णयाची अंमलबजावणी करताना अडचण होत असल्याचं स्कूल बस मालकांचा म्हणणं आहे.
राज्य सरकारला इशारा
निर्णयावर फेरविचार न केल्यास आणि स्कूल बस मालकांना सक्ती केल्यास स्कूलबस चे भाडे 25 ते 40 टक्क्यांनी वाढवणार असा इशाराही स्कूल बस मालकांनी दिला आहे. पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंत शाळा सकाळी नऊ नंतर भरवण्याच्या शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला स्कूल बस मालक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. शाळा व्यवस्थापन आणि स्कूल बस मालकांशी कुठल्याही प्रकारे चर्चा न करता हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्याचा स्कूल बस मालकांचे म्हणणं आहे
'गर्दीच्या वेळेत स्कूल बस कशा चालवणार'
सकाळी नऊला जर शाळा भरत असेल तर मुंबईत गर्दीच्या वेळी म्हणजेच पीक आवर मध्ये स्कूल बसला फेऱ्या माराव्या लागणार आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि रस्त्याची स्थिती याची जाणीव राज्य सरकारला आहे. शिवाय प्राथमिक शाळा सकाळी नऊ नंतर भरवल्यास दोन शिफ्टचे व्यवस्थापन स्कूलबस मालकांना शक्य होणार नाहीत. यामुळे स्कूलबस एकूण आठ फेऱ्या गर्दीच्या वेळी माराव्या लागणार आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्याची जाण्याची आणि येण्याची वेळ असल्याने या गर्दीत विद्यार्थ्यांना ने-आन करणे हे अधिक अडचणीचे होणार असून यामध्ये अधिकचा वेळ लागणार आहे असं स्कूल बस चालकांचं म्हणणं आहे.
जर यावर निर्णय बदलला नाही आणि बस मालकांना ही वेळ जर सक्तीची केली तर स्कूल बस मालक संघटना स्कूलबस भाडे 25 ते 40 टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे किंवा काही शाळांसाठी प्राथमिक शाळेसाठी स्कूल बस सेवा देणे कठीण असल्याचं संघटनांकडून सांगण्यात आलंय.
राज्यपालांनी केली होती सूचना
राज्यपाल रमेश बैस यांनी एका भाषणात शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. यावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसंच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय मागवण्यात आले होते.