दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : गल्ली ते दिल्ली भाजपची दिग्विजयी घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांनी वेगळाच मार्ग अवलंबलाय... त्यासाठी सर्व विरोधकांनी  येत्या २१ ऑगस्टला मोर्चाची हाक दिली आहे. हा लढा ईव्हीएम अर्थात ईलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राच्या विरोधात असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ताधारी वगळता अन्य राजकीय पक्षांची एकजूट यामध्ये दिसत आहे.


लोकसभा निवडणुकीत भाजपानं विरोधकांचं पुरतं पानिपत केलं. भाजपपुढं धुव्वा उडलेल्या विरोधी पक्षांनी आता नवी राजकीय लढाई सुरू केली आहे. ईव्हीएम अर्थात ईलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राच्या विरोधात त्यांनी एकमुखानं आवाज बुलंद केला आहे. ईव्हीएमद्वारे होणाऱ्या निवडणुकांच्या निकालाबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक घ्यावी, या मागणीसाठी विरोधकांनी येत्या २१ ऑगस्टला राजधानी मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे.


एवढंच नव्हे तर येत्या १५ ऑगस्टला राज्यभरात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याचा ठराव संमत करावा आणि तो निवडणूक आयोगाला पाठवावा, असं आवाहन विरोधकांनी केलं आहे.


दरम्यान, यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ईव्हीएमवरून आंदोलन करण्याऐवजी विरोधकांनी आत्मचिंतन करावं असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.


याआधी विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तिथं ईव्हीएमच्या गैरवापर होतो, हे सिद्ध करण्यात विरोधक अपयशी ठरले. आता त्यांनी राजकीय लढाई सुरू केली आहे. निवडणूक आयोग त्याबाबत काय भूमिका घेतंय, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.