खडसेंवरच्या अन्यायाला विरोधकांनी विधानसभेत फोडली वाचा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांबरोबर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला अनेकदा अडचणीत आणले. खडसेंनीच आपल्याच सरकारवर अनेकदा टीका केली. याचीच परतफेड म्हणून की काय विरोधकांनी आज विधानसभेत एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांबरोबर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला अनेकदा अडचणीत आणले. खडसेंनीच आपल्याच सरकारवर अनेकदा टीका केली. याचीच परतफेड म्हणून की काय विरोधकांनी आज विधानसभेत एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी खडसेंची बाजू घेत त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कसा अन्याय केला आहे, ते मांडण्याचा प्रयत्न केला. पुण्याजवळीस भोसरी एमआयडीसीतील साडे तीन एकर जमिनीप्रकरणी खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात नव्हतीच.
४६ वर्षांपूर्वी एमआयडीसीने ही जमीन संपादित करण्यासाठी नोटीफिकेशन काढले होते. मात्र, ही जमीन संपादितच करण्यात आली नाही. त्यामुळे एमआयडीसीलाही या जमिनीबाबतचा विसर पडला होता. तसेच ही जमीन खडसेंच्या जावयाने मूळ मालकाकडून विकत घेतली.
मुख्यमंत्र्यांनी मात्र याप्रकरणी खडसेंची चौकशी न करता राजीनामा घेतला. दुसरीकडे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्यातील एमआयडीसीची 30 हजार एकर जमीन वगळली, पण मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करत नाहीत.