गणेशोत्सवाला गालबोट; पालघरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू
Palghar Crime : पालघरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये दोन परप्रांतियांचा देखील समावेश आहे.
Ganeshotsav 2023 : मंगळवारपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाला (Ganesh Chaturthi 2023) देशभरात जोरदार सुरुवात झाली आहे. त्यानंतर बुधवारी भाविकांनी दीड दिवसासाठी घरोघरी विराजमान झालेल्या गणपतीला (Ganesh Visarjan) भावपूर्ण निरोप दिला. मात्र या सणाला पालघरमध्ये गालबोट लागलं आहे. पालघरमध्ये (Palgahr) विसर्जनावेळी झालेल्या अपघाताच्या घटनांमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या घटनांमुळे पालघरमध्ये शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये दोन परप्रांतियांचाही समावेश आहे.
पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यातील कोणसई गावातील 2 परप्रांतीय कामगारांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर गोऱ्हे येथे तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आली आहे. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी कोणसई गावातील ओहळावर कंपनीच्या गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने जगन मौर्य (वय 38) व सुरज प्रजापती (वय -25) या दोन परप्रांतीयांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर गोऱ्हे येथील तलावात प्रकाश ठाकरे यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
दीड दिवसांच्या 38, 415 गणेशमूर्तींचे विसर्जन
मुंबईत बुधवारी दुपारपासूनच नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जनासाठी भाविकांनी येण्यास सुरुवात केली होती. रात्री 9 वाजेपर्यंत एकून 38, 415 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये 96 सार्वजनिक गणेश मूर्ती होत्या. 38, 319 घरगुती मूर्तींपैकी 17, 175 मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. तर, 49 मूर्तींचे सार्वजनिक मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.
विसर्जनासाठी प्रशासनाकडून ठिकठिकाणी तयारी
दरम्यान, मुंबईत महापालिकेने प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. नागरिकांना या कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आल आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीला स्वयंवसेवी संस्थादेखील आहेत. तसेच विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे. यासोबतच ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांच्या दरम्यान मुंबईच्या समुद्र किनारी स्टिंग रे, जेलीफिश आढळून येतात. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी समुद्र किनारी येणाऱ्या गणेश भक्तांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.