हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : पालघरच्या (Palghar) ग्रामीण भागातील शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. कधी शिक्षकांच्या कमतरतेमुळे तर कधी रोजगाराच्या होणाऱ्या स्थलांतरणांमुळे इथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कायमच दुरावस्था झालेली पाहायला मिळते. मात्र अशा परिस्थितही लाडक्या पालकर या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या टॅलेंटचे सर्वच जण कौतुक करतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 वर्षे वय असणारा लाडक्या लखमा पालकर हा डहाणू तालुक्यातील पूर्वेस असलेल्या चरिकोठबी येथील खिंडीपाडा या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतोय. लाडक्याची आई तो अवघ्या दोन ते तीन वर्षांचा असतानाच वारली. वडील रोजगारासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराबाहेर असतात. अशात लाडक्याचा सांभाळ हा त्याची आजी करतेय. मात्र सध्या लाडक्या एका वेगळ्याच कारणाने जिल्ह्यात चर्चेत आला आहे .


जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पाचवीत शिक्षण घेणाऱ्या लाडक्याने नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या परीक्षांसाठी गुणाकार भागाकारासह गणित अगदी पक्क असायला हवं असं त्याला त्याच्या शाळेत शिकवणाऱ्या अंकुश धडे या शिक्षकांनी सांगितलं. मग लाडक्याने हीच गोष्ट लक्षात ठेवली. त्यानंतर लाडक्या जिथेही जायचा तिथे पाढ्यांसोबतच. गेल्यावर्षी पर्यंत 50 पर्यंत पाढे पाठ असणारा लाडक्या आता अगदी दोन पासून 125 पर्यंत पाढे बोलतोय तेही तोंडपाठ.


पहिलीपासूनच लाडक्या हुशार असल्याने त्याला शिक्षकांकडून नेहमीच त्याच कौतुक व्हायचं. त्यातच त्याला नवोदय आणि स्कॉलरशीपच्या परीक्षेची तयारी करण्याचं शिक्षकांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे लाडक्या घरकाम असो किंवा शाळेतल्या साफसफाईच काम तो नेहमीच आपल्या खिशात पाढे लिहिलेलं कागद ठेवायचा. असं करत करत लाडक्याने 125 पर्यंतचे पाढे तोंडपाठ केले. त्याचं शिक्षकांसह गावातील नागरिकांकडूनही कौतुक केले जात आहे . कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही लाडक्याने आपल्या मनाशी बांधलेली गाठ आणि केलेला निश्चय पूर्ण केला आहे.