मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा गोंधळ झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार  करता ऑनलाईन शिक्षण पद्धत अवलंबली आहे. मात्र या परिस्थितीत शाळेकडून विद्यार्थ्यांना आणि पालकांना फी भरण्यासाठी आग्रह केला जात आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या काळात सरकारने शाळांना फी साठी तगादा लावू नये असं सांगितलं असताना शाळेचे व्यवस्थापन मात्र त्यावरच जोर धरत असल्याचं समोर आलं आहे. असाच एक प्रकार दिल्ली पब्लिक स्कूल - पनवेल ( DPS Panvel) शाळेत घडल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पालकांनी या विरूद्ध आवाज उठवत ट्वीटरच्या माध्यमातून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दाद मागितली आहे. 



दरम्यान ट्वीट मध्ये देण्यात आलेल्या माहिती नुसार, DPS Panvel च्या पालकांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि सरकार मधील अधिकार्‍यांना टॅग करत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसपासून वंचित ठेवण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर मानसीक ताण येत आहे.  Coronavirus: शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क आकारु नये, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. 



महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार, देशातील कोरोनाची स्थिती पाहता यावर्षी पालकांकडून पूर्ण फी घेऊ नये, त्यांना सवलती द्याव्यात तसेच विद्यार्थ्यांना फीच्या कारणावरून ऑनलाईन शिक्षणापासून दूर ठेवता येणार नाही असे निर्देश दिले होते. मात्र त्यांचं उल्लंघन महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी होताना दिसत आहे. ३० सप्टेंबर पर्यंत शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास बंद ठेवण्याचे आदेश मिशन बिगिन अगेनच्या नव्या नियमावलीमध्ये दिले आहेत.