दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला आहे. मला यावर काहीही बोलायचं नाही, असं पार्थ पवार म्हणाले आहेत. पार्थ पवार यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे, असं शरद पवार म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंग राजपूत मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून केली. 'मुंबई पोलिसांना मी गेली ५० वर्षे ओळखतो, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कुणी काय आरोप केले, यात मी खोलात जाणार नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. एवढं करुनही ज्यांना सीबीआय चौकशी हवी असेल, तर माझा त्याला विरोध नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. 


मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पार्थ पवार जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळ सक्रीय नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं असतानाही पार्थ पवार यांनी सुशांतसिंग प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला विरोध करत असतानाच पार्थ पवार यांनी भाजपच्या मागणीलाच एक प्रकारे समर्थन करत, महाविकासआघाडीला अडचणीत आणलं. 


पार्थ पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा देणारं ट्विटही केलं. जय श्रीराम म्हणत पार्थ पवार यांनी राम मंदिरासाठी शुभेच्छा देणारं पत्रही  लिहिलं. राम मंदिर भूमिपूजनामुळे कोरोना जाणार नाही, असं म्हणणाऱ्या शरद पवारांच्या भूमिकेलाही पार्थ पवार यांनी छेद दिला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला पार्थ पवार यांची ही वैयक्तिक भूमिका आहे, असं सांगत सारवासारव करावी लागली.