ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया: राज्यात प्लास्टीक बंदी लागू झालीय. पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्लास्टिक विरोधात उत्साह दिसला. अनेक ठिकाणी लोक भाजी आणायला कापडी पिशव्या वापरताना दिसले. मात्र दंडात्मक कारवाईबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या दिसून आल्या. दरम्यान, पर्यावरणाला हानी पोहोचवणारं आणि नद्या नाले तुंबवणारं प्लास्टिक राज्यातून हद्दपार होणार आहे. प्लास्टिक बंदीसाठी सरकारने दंडात्मक कारवाई निश्चित केलीय.


प्लास्टिकबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यास?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लास्टिक बंदी कायद्यानुसार पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्यास पाच हजार रूपये, दुसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास १० हजार रूपये तर तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रूपये आणि तीन महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा होणार आहे. 


प्लास्टिक जमा करण्याचे अवाहन


कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या जवळील प्रतिबंधीत प्लास्टिक पालिकेच्या संकलन केंद्रात जमा करावं असं आवाहन करण्यात आलंय. मुंबई महापालिकेने मुंबईत विविध ठिकाणी २७ संकलन केंद्र सुरू केली आहेत. ओला आणि सुका कचरा संकलन केंद्रातही प्लास्टिक गोळा केलं जाईल. प्लास्टिकबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मनपाने २५० अधिकारी नेमले आहेत. त्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आलेत.


ग्रामीण भागात ग्रामसेवकांना अधिकार..


राज्यातल्या इतर पालिका क्षेत्रात आयुक्तांना तर ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामसेवकांना कारवाईचे अधिकार देण्यात आलेत. नागरिकांनी या प्लास्टिक बंदीचं उस्फूर्त स्वागत केलंय. अनेक ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांनी कापडी पिशवी वापरल्याचं चित्रं होतं. त्यानिमित्ताने कापडी पिशव्यांचा खपही वाढला.


प्लास्टिकला पर्याय काय?


मात्र नागरिकांनी बंदीचं स्वागत केलं असलं तरी व्यापाऱ्यांनी या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणी बाबत शंका उपस्थित केलीय. प्लास्टिकला पर्याय काय असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय. तर, प्रशासनाने मात्र प्लास्टिक बंदीच्या पहिल्या दिवशी जनजागृती करण्यावर भर दिलाय. मुंबईत मनपाने विविध ठिकाणी रॅली काढून व्यापाऱ्यांना प्लास्टिक न वापरण्याच्या सूचना दिल्या. सोमवारपासून दंडात्मक कारवाई सुरू केली जाणार आहे. 


राज्यभरात प्लास्टिकविरोधात कारवाई


सोमवारपासून मात्र मुंबई मनपा दंडात्मक कारवाई सुरू करणार आहे... मात्र मुंबई वगळता पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, उल्हासनगर महापालिका क्षेत्रात दंडात्मक कारवाया सुरू झाल्या आहेत. प्लास्टिक हे पर्यावरणाला हानीकारक आहे हे नागरिकांना मान्य असल्याचं पहिल्या दिवसाच्या प्रतिक्रियांवरून तरी दिसलं. तरीही अजूनही दंडात्मक कारवाईबाबत नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये दंडात्मकबाबत साशंकताच आहे...