मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या  १४६ भारतीय खलाशी आणि नाविक यांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी अखेर मिळाली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बातचीत केल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी यासंदर्भातील एक आदेश जारी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या या आदेशाचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेल्या सुमारे ४० हजार खलाशी आणि जहाजावरील कर्मचाऱ्यांनासुद्धा होणार आहे. गुरुवारी सकाळपासूनच क्रुझ वरील खलाशी आणि कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरावर उतरवण्यास सुरुवात होईल. 


कोरोना Coronavirus विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्याचं झपाट्याने वाढतंप्रमाण पाहता या खलाशांची रितसर वैद्यकीय तपासणी होणार आहे. गरज भासल्यास त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध करण्यात आली आहे. 


२ ते ६ एप्रिल या कालावधीत 'मरिला डिस्कव्हरी' ही  क्रुझ कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई अशा ठिकाणी पोहचणार होती. दरम्यान कोरोनाचा उद्रेक सुरु झाला आणि या क्रुझने  लाएम चाबँग या थायलँड येथे १४ मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. पुढे ही क्रुझ १२ एप्रिल रोजी कोचीन येथे पोहचली पण या क्रुझवरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास मात्र परवानगी नाकारण्यात आली. 


कालांतराने मुंबईजवळच्या समुद्रात १४ एप्रिल रोजी ही क्रुझ पोहचली आणि तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याच्याच प्रतिक्षेत होते. दम्यान, जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास कोरोना लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. थायलँड सोडून ३७ दिवस उलटूनही जहाजावर कुठलाही संसर्ग नसल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली पण, तरीही खलाशांना बंदरावर उतरण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. अखेर खुद्द मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. 


 


उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात ही सर्व परिस्थिती नौकानयन मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली. प्रधान सचिव विकास खारगे , आशिष कुमार सिंह आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया हे सातत्याने पाठपुरावा करत होते. दरम्यान, केंद्राकडून यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये खास कार्यपद्धती निश्चित केली आहे. ज्याअंतर्गत कर्मचाऱ्यांनी त्याच्या मागील २८ दिवसांच्या प्रवासाची माहिती कळवणं, बंदरावर उतरल्यास कोरोनाची चाचणी करणं, प्रसंगी क्वारंटाईन करणं, खलाशी आणि कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यासाठी ट्रांझिट पास, वाहनसोय अशा बाबींची नोंद आहे.