मुंबई : ‘कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी  देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  आज  मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीवापराचे ट्रॅक्टर, हार्वेस्ट्रर आदी वाहनांना पुरेसे पेट्रोल, डिझेल उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने ‘कम्युनिटी लंगर’ सुविधा सुरु केली आहे.


 त्याच धर्तीवर खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यातल्या अन्य शहरात देखिल कम्युनिटी किचन सुरु करण्यात यावेत तसेच नागरिकांना ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या १ लाख ७० हजार कोटी पॅकेजचे तसेच अन्य उपाययोजनांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  स्वागत केले आहे.