मुंबई  : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन देशातून पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये साहित्यिक आणि विचारवंतांचा समावेश आहे. त्यांच्या हिंसाचार प्रकरणाशी संबंधित पुरावे जाहीरपणे सादर केल्याने राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण सामाजिक कार्यकर्ते संजीव भालेराव यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे अतिरीक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी ३१ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या पाचही सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला होता. दरम्यान, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या या पत्रकार परिषदेवर टीका केली होती.  हे प्रकरण न्यायालयात असताना पोलीस पत्रकार परिषद कशी काय घेऊ शकतात, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला गेला होता. 


दरम्यान, परमवीर सिंग गोपनीय पुरावे पत्रकार परिषदेत दाखविणे आणि न्यायालयाचा अवमान करणे याबद्दल परमवीर सिंग यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात परमवीर सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.  सामाजिक कार्यकर्ते संजीव भालेराव यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. 



परमवीर सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाचे माहिती आणि पुरावे या पत्रकार परिषदेत सार्वजनिक केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेय. त्याचप्रमाणे न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश देऊन घटनेच्या कलम ३११ अन्वये या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करावे, अशीही याचिकेद्वारे मागणी करण्यात आलेय. कलम ३११ मध्ये सनदी अधिकाऱ्यांनी जर काही गैरवर्तन केले तर त्यांना बडतर्फ करण्याची तरतूद आहे, असे याचिककर्त्यांचे वकील नितिन सातपुते यांनी माहिती दिलेय.