मुंबई : राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचआरसीटी चाचणी १६पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर समितीने निश्चित केले आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यासंदर्भात समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते.


कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार रुपये इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


राज्य शासनाने कोरोना  साथरोगाच्या कालावधीत एक आवश्यक बाब म्हणून विविध उपचार व चाचण्यांचे दर निश्चित केले होते. मात्र एचआरसीटी आणि एमआरआयसह इतर काही चाचण्यांचे दर निश्चित झाले नव्हते. मात्र काही खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांकडून सदर चाचण्यांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचे निदर्शनास येत होते. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. याबाबतच्या तक्रारींची दखल घेत  एचआरसीटी आणि एमआरआयसह विविध वैद्यकीय चाचण्या व उपचार यांची तातडीने दर निश्चिती करण्यात आली.


यासाठी एक समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे समितीने शिफारस केलेले निश्चित करण्यात आले असून अतिरिक्त शुल्क आकारणी थांबेल आणि लाखो रुग्णांना दिलासा मिळेल. विशेष म्हणजे ग्रामीण भागात केवळ १६ स्लाईसच्या मशीनवर चाचणी होत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना अतिशय अल्प दरात ही सुविधा उपलब्ध झाली आहे.  एचआरसीटी समान दर निश्चितीमुळे आरोग्य क्षेत्रात एकसूत्रता येऊन जनतेला याचा थेट लाभ मिळणार आहे.