PM Narendra Modi Mumbai Visit BKC: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे. आज मुंबईतल्या विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी मुंबई शहरात रस्त्यारस्त्यांवर मोदींच्या स्वागताचे पोस्टर लावले आहेत. परंतु मोदी मुंबईत येण्याअगोदरच मात्र बीकेसीतील एक स्वागत कमान कोसळली आहे. या घटनेत सुदैवानं कोणीही जखमी झालेले नाही. ही स्वागत कमान कोसळ्यानंतर तातडीनं आयोजकांकडून कमान पुन्हा व्यवस्थित उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या या घटनेनं राजकीय चर्चाही रंगू लागल्याचे दिसते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमान कोसळली तेव्हा लोकांची गर्दी जमू लागली परंतु पोलिसांचा बंदोबस्त असल्यानं पोलिसांकडून लगेचच गर्दी हटवण्याचे काम करण्यात आले. बीकेसी मैदानावरील सभेच्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही कमान लावण्यात आलेली होती. त्यातून ही कमान अचानकच कोसळल्यानं नक्की ही कमान कोसळली तरी कशी याचे कारणं काही स्पष्ट झालेले नाही. 


नागपूरनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतील विविध विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत. यासाठी बीकेसीत सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत आज मुंबईत 38 हजार कोटी रुपये मूल्याच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत महापालिका निवडणूकीच्या प्रचाराही सुरूवात होईल. 17 हजार 182 कोटींच्या 7 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे आणि पालिकेच्या तीन रुग्णालयांच्या 1 हजार 108 कोटींच्या बांधकामाचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 


त्याचबरोबर 6,049 कोटी रुपयांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामांचे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील 1 हजार 813 कोटींच्या पुनर्विकासाच्या कामांचेही भूमिपूजन करण्यात येणार आहे. यासोबतच खालील काही महत्त्वाच्या विकासकामांचेही त्यांच्याकडून उद्धाटन होणार आहे. 


पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा असा आहे तपशील 


- 1 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जाचे वितरण 


-  महानगरपालिकेच्या 20 नवीन आपले दवाखाने यांचे उद्धाटन


- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गिका 2A म्हणजेच 'दहिसर पूर्व - डी. एन. नगर' या 6 हजार 410 कोटींच्या प्रकल्पासह मेट्रो मार्ग 7 म्हणजे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा 6 हजार 208 कोटींचा मेट्रो प्रकल्पाचे उद्धाटन  


- 319 किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ