दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: गलवान खोऱ्यातील भारतीय हद्दीत चीनने कोणत्याही प्रकारची घुसखोरी केली नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा चीनकडून गैरफायदा घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, चीनने भारतीय हद्दीत अतिक्रमण केले नाही, हा पंतप्रधान मोदींचा दावा साफ खोटा आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे वाटाघाटींमध्ये भारताची भूमिका दुर्बल झाली आहे. मात्र, यामुळे पंतप्रधान मोदी चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी परराष्ट्र मंत्र्यांनी प्रत्यक्ष ताबा रेषेच्या परिसरात भारतीय हद्दीत चिनी सैनिकांकडून बांधकाम करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही घुसखोरी झालीच नसल्याचे म्हटले. त्यामुळे भारताकडून आधी करण्यात आलेल्या वक्तव्यांना कोणताही अर्थ उरला नाही. 


माजी लष्करप्रमुख डी.एस. हुड्डा यांच्या दाव्यानुसार, उपग्रहांद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैन्याची वाहने आणि तोफखाना स्पष्ट दिसत आहेत. या भागात तब्बल १० हजार चिनी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तसेच कालच समोर आलेल्या माहितीनुसार, फिंगर ४ आणि फिंगर ८ भागात चीनकडून नवे बांधकाम करण्यात आले आहे. मग तरीही पंतप्रधानांनी चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही, असे का म्हटले? या वक्तव्यासाठी चीनने भारतीय पंतप्रधानांचे कौतुक केले. मोदी चीनमध्ये लोकप्रिय झाले आहेत. यामुळे वाटाघाटीतील भारताची भूमिका दुर्बल झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

काँग्रेसकडून हा मुद्दा वारंवार मांडण्यात आला. मात्र, सरकार त्याकडे लक्ष देत नाही. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यावर प्रश्न उपस्थित करणे, हे विरोधकांचे कर्तव्य आहे. या प्रश्नांची योग्य उत्तर देणे सरकारचे काम आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले. 

दरम्यान, या पत्रकारपरिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या मुद्द्यावरुनही मोदी सरकारला लक्ष्य केले. १६ मे २०१४ रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल १०७ डॉलर्स इतकी होती. १५ जून २०२० ला हा दर प्रतिबॅरल ४० डॉलर्स इतका आहे. तरीही इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षात केंद्र सरकारने इंधनावरील करात ८१९ टक्के वाढ केली. ही दरवाढ सरकारने कमी करावी. अन्यथा काँग्रेस याविरोधात राज्यभरात आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.