मुंबई : पीएमसी बँकेच्या ग्राहकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. डबघाईला आलेल्या पीएमसी बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यातून ६ महिन्यांतून एकदा प्रत्येकी १० हजार रुपये काढता येईल, असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर अनेकांना दिलासा मिळाला आहे. जवळपास ६० टक्के गोरगरीब ग्राहकांना आपल्या खात्यातील सर्वच्या सर्व रक्कम काढणे शक्य होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमसी बँक डबघाईला आल्यानंतर केवळ एक हजार रुपये खात्यातून काढता येतील, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले होते. त्यामुळे खातेदारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच अनेक खातेदारांचे धाबे दणाणले होते. मात्र आता नव्या आदेशामुळे बहुसंख्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.


'जबाबदार व्यक्तीवर कारवाई करा'


दरम्यान, पीएमसी बँक बंद होण्यास जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी तसेच एचडीआयएल कंपनीचे बिल्डर दिवाण यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. पोलीस मुख्यालयात आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त राजवर्धन सिन्हा यांची भेट घेऊन सोमय्यांनी गुरुवारी ही मागणी केली. 
पीएमसी बँकेकडून एचडीआयएल कंपनीवर पैशांची खैरात करण्यात आली. त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. याबाबत ते लवकरच रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरची भेटही घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.