PNB घोटाळा : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
नीरव मोदीला लवकरच भारतात आणलं जाणार
मुंबई : युकेच्या गृहमंत्र्यांनी 13 हजार 600 कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती दिली आहे. नीरव मोदी लवकरच भारताच्या ताब्यात येणार आहे. भारत सरकारच्या प्रत्यार्पणाच्या मागणीला युके सरकारने परवानगी दिली आहे.
आता नीरव मोदी लंडनमधील कारागृहात आहे. नीरव मोदी यांच्या तीन कंपन्या, त्यांचे अधिकारी आणि पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यावर कारवाई सुरू आहे. नीरव मोदीने PNB ची बार्टी हाऊस शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत 11 हजार करोड रुपयांचा घोटाळा केला आहे.
नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याबाबत लंडनमधील वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने 25 फेब्रुवारीला निर्णय दिला होता. या निर्णयानंतर नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग कोर्टाने मोकळा केला होता. आज युनायटेड किंगडमच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदीला भारताकजे सुपूर्द करण्यास मंजूरी दिली आहे. भारतातील CBI च्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून १४ हजार कोटींहून अधिक घोटाळा केला असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नीरव मोदीविरोधात सक्त वसुली संचालनालय आणि सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. त्याशिवाय इतरही काही गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
भारतात आणल्यानंतर नीरव मोदीला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. ऑर्थर रोड तुरुंगात एक विशेष सेल तयार ठेवण्यात आला आहे. मोदीला बराक क्रमांक १२ मध्ये असलेल्या तीनपैकी एका सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. ऑर्थर रोड तुरुंगातील बराक क्रमांक १२ हा अतिसुरक्षित समजला जातो.