मुंबई : मुंबईत आर्थररोड पूल हा धोकायदायक आहे. तसा फलक देखील मुंबई महापालिकेने लावला आहे. याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला तसेच रेल्वेला देखील आहे. हा पूल १९११ साली बांधला गेला आहे, तो आता धोकायदायक जाहीर झाला असला, तरी देखील मागील महिन्याभरापासून या पुलावरून रात्री दररोज ९० ते १०० ओव्हरलोड डंपर नेले जातात. कोस्टलरोडच्या कामासाठी मोठे दगड या डंपरमधून नेले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व काही संबंधित प्रशासनाला समजतं, यासाठी बोर्ड देखील लावलाय, तरी ही वाहतूक बंद करण्याचं फक्त सोंग केलं जातं आहे.


सीसीटीव्हींचा उपयोग काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याविषयी स्थानिक लोकांनी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे चिंचपोकळीच्या गणेश टॉकीजकडून हे ओव्हरलोड डंपर जेव्हा एकानंतर एक जातात तेव्हा ते पोलिसांच्या सीसीटीव्हीत चित्रित होत आहेत. 


प्रशासनं एवढं ढिम्मं, नेमका 'अर्थ' काय? पोलीस, रेल्वे आणि बीएमसी


तरीही कारवाई होत नसल्याने मोठी दुर्घटना घडल्यास स्थानिक पोलीस अधिकारी, बीएमसीचे अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी जबाबदार असतील, असं स्थानिक रहिवाशांनी म्हटलं आहे.


विशेष म्हणजे, एवढी गंभीर बाब असतानाही सत्ताधारी शिवसेना आणि ज्वलंत प्रश्नांवर बोलणाऱ्या मनसेकडून याबाबतीत कोणतीही ठाम भूमिका घेतली जात नसल्याने रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.


२ दिवस पोलिसांनी डंपर परतवून लावले पण...


स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर २ दिवस पोलिसांनी हे डंपर परतवून लावले, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र २ दिवसानंतर या चौकात पोलीस दिसेनासे झाले आहेत, आता स्थानिकांनी पूल पडेल, मोठा अपघात होईल या भीतीने हे डंपर परतवून लावले आहेत, मात्र पुन्हा रात्री हा धोकादायक वाहतुकीचा खेळ जोर धरतो.


ओव्हरलोड डंपर चालवणाऱ्यांकडे अनेकांकडे लायसन्स नाहीत


एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. हे डंपर अतिशय ओव्हरलोड दिसून येतात, हे सर्व ड्रायव्हर परप्रांतिय असले, तरी बहुतेकांकडे लायसन्स नाहीत, घरी आहे, कंपनीच्या ऑफिसमध्ये लायसन्स राहिलं अशी यांची उत्तरं असतात, तसेच हे ड्रायव्हर पाहिल्यानंतर कमी वयाचे देखील वाटतात.


महापालिकेकडून कारवाई अपेक्षित मात्र...


या डंपर चालकांकडे महापालिका आयुक्तांचं एक पत्र आहे, त्यावर सहकार्य करा, असं म्हटलंय, पण निश्चित या डंपरांचा रस्ता मात्र दिलेला नाही. अर्थातच आर्थररोड पूल धोकायदायक असल्याने कोस्टल रोडच्या कामासाठी जरी ही वाहतूक असली तरी, या धोकायदायक मार्गाने ही वाहतूक करता येणार नाही. या प्रकरणी महापालिकेकडून मोठी कारवाई अपेक्षित असताना बीएमसीने याकडे कानाडोळा केल्याचं दिसून येत आहे.


मोठी जिवितहानी होवू शकते


मध्य रेल्वेकडून या प्रकरणी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. कारण आर्थररोड पुलाकडून मोठ्या प्रमाणात रेल्वेची वाहतूक सुरू असते, या पुलाला काहीही झालं तर रेल्वेला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. या पुलाचं काहीही झालं तर सर्वात मोठा फटका रेल्वेला तो देखील जिवितहानीच्या स्वरूपात बसणार आहे. कारण लोकल गाड्या आणि एक्सप्रेस गाड्यांची वर्दळ या पुलाखालून सुरू असते.


गणेश विसर्जनाला काळजी घेतली मग आता का नाही?


गणेश विसर्जनाची मिरवणूक आर्थररोड पुलावरूनच जाते. तेव्हा गणपती ज्या वाहनाने नेला जातो, तिथे मूर्तीसोबत निवडक लोकांना उभं राहण्याची सूचना देण्यात आली, तसेच पुलावर जास्त गर्दी न करता, वाहन आजूबाजूची गर्दी कमी करत मिरवणूक पुढे नेली.


गणेशभक्तांनी देखील पुलाची स्थिती पाहून तंतोतंत सूचना पाळत पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं. पण आज एका रात्रीतून शंभर-शंभर ओव्हर लोड डंपर यापुलावरून नेले जातायत, त्यावेळी असं सुरू ठेवणं म्हणजे रेल्वेसाठी मोठ्या अपघाताला आमंत्रण असल्याचं, पुलाला बसणाऱ्या हेलकाव्यांवरून स्पष्ट होत आहे.