रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला पोलिसाचा बळी
मुंबई : मुंबईच्या रस्त्यांची नेहमीच चाळण झालेली असते. त्यावर अनेक वाद झाले, बातम्या झाल्या अगदी अपघातही झाले. अनेकांनी आपला जीव गमावला.
मुंबई : मुंबईच्या रस्त्यांची नेहमीच चाळण झालेली असते. त्यावर अनेक वाद झाले, बातम्या झाल्या अगदी अपघातही झाले. अनेकांनी आपला जीव गमावला. तरी देखील रस्त्याची परिस्थिती 'जैसे थे' च आहे. आता या खड्ड्यांनी पोलीसाचा बळी घेतला आहे.
सायन-पनवेल मार्गावरून घरी परत असणाऱ्या संतोष शिंदे पोलिसाचा आठवड्याभरापूर्वी बाईक खड्यात आदळल्याने अपघात झाला होता. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, उपचारादरमान्य त्यांचा मृत्यू झाला. संतोष शिंदे हे विले-पार्ले पोलीस ठाण्यात काम करत असून नवी मुंबईतील नेरूळ येथे ते रहात होते.
आठवड्याभरापूर्वी आपले काम संपवून मोटरसायकलवरून रात्री २ च्या सुमारास घरी परतत असताना शिंदेंची बाईक खड्यात आदळली आणि हा अपघात झाला, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बरकाळे यांनी दिली. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील मोठा खड्डा शिंदे यांना दिसला नाही. अपघातानंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरावर आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या. हा अपघात इतका जबरदस्त होता की, हेल्मेट असूनही ते गंभीर जखमी झाले, असेही बरकाळे यांनी सांगितले.
‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार या अपघाताची माहिती मिळताच बीट मार्शलची टीम वाशी पोलीस ठाण्यातून तातडीने अपघाताच्या ठिकाणी गेली. तिथून शिंदे यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शिंदे यांना अति दक्षता विभागातही दाखल करण्यात आले. परंतु, अखेर त्यांचा मृत्यू झाला.