विधानसभा निवडणूक : ९.५३ कोटींची रोकड तर ४३.८ कोटींचा मुद्देमाल जप्त
विधानसभा निवडणूक कालावधीत आतापर्यंत ९.५३ कोटींची रोकड तर ४३.८ कोटींचा मुद्देमाल जप्त
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक घोषीत करण्यात आल्यानंतर आचारसंहिता लागली. या कालावधीत निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादनशुल्क विभाग आदी विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ९.५३ कोटींची रोकड तर ४३.८ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत गुजरातमधून आलेल्या कारमधूनएक कोटींची रोकड पकडली. पोलिसांनी रात्रीच्यावेळी नाकबंदीच्यावेळी ही एक कोटी रुपयांची रोकड पकडली होती.
गुजरातमधून आलेल्या गाडीत एक कोटींची रोकड
९ कोटी ५३ लाखांची रोख रक्कम, दारु, मादक पदार्थ, सोने- चांदी आदी स्वरुपात ४३ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली. भरारी पथके (एफएस), स्थीर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस, आयकर आणि सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत ९ कोटी ५३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भरारी पथके आणि पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत ९ कोटी ७१ लाख रुपये किमतीची ११ लाख ८८ हजार ४०० लिटर दारु जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक यंत्रणा आणि अंमली पदार्थ विरोधी दलाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत १५ कोटी ७ लाख रुपयांचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय ८ कोटी ७७ लाख रुपयांचे सोने, चांदी जप्त केली आहे.