मुंबई: पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार आहे. मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यांकडून शुक्रवारी ही माहिती देण्यात आली. त्यामुळे आता यावर लालबागचा राजा मंडळ काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
  
  पोलिसांच्या माहितीनुसार, सध्या धक्काबुक्कीचा प्रसंग घडला त्यावेळचे फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. यामधून जे कार्यकर्ते दोषी आढळतील त्यांच्यावर अनंत चतुदर्शीनंतर कारवाई होईल, असे स्पष्ट संकेत पोलिसांनी सांगितले. 
  
  काही दिवसांपूर्वी गर्दीचे नियंत्रण करण्यावरून लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की केली होती. आम्हाला आमचे काम करू द्या, असे पोलिसांचे म्हणणे होते. तर गर्दीचे काय ते आम्ही बघतो, असे लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. यावेळी काही मुजोर कार्यकर्ते पोलीस उपायुक्तांच्या अंगावर धावून गेले होते.