मुंबई: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर देशभरात तातडीने निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली. मात्र, मुंबई आणि ठाण्यातील राजकीय पक्षांना याची फारशी फिकीर नसल्याचे दिसत आहे. कारण, आचारसंहिता लागू होऊन ४८ तास उलटल्यानंतरही शहराच्या अनेक भागांमध्ये राजकीय बॅनर्स दिमाखात झळकत आहेत. ठाण्याचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी शेवटच्या क्षणाला मतदारसंघात अनेक भूमीपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम उरकून घेतले. यावेळी ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून या विकासकामांचे गोडवे गाणारे बॅनर्स लावण्यात आले होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेने शहरातील हे बॅनर्स काढून टाकले. मात्र, रेल्वेच्या हद्दीत अवैधपणे लावण्यात आलेले बॅनर्स अजूनही तसेच आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ रेल्वे स्थानकातही हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे आचारसंहितेत रेल्वेच्या हद्दीत बॅनर्स लावलेले चालतात का? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. 


लोकसभा निवडणूक: इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू


सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात ११ एप्रिल, १८ एप्रिल, २३ एप्रिल आणि २९ एप्रिल अशा चार टप्प्यात मतदान होणार आहे. हे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर देशभरात तातडीने निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली होती. यादरम्यान निवडणूक आयोगाकडून पारंपरिक जाहिरातींबरोबरच फेसबुक, ट्विटर, यूट्यूब या समाज माध्यमांवरील राजकीय जाहिरातींवरही कडक नजर ठेवली जाणार आहे.